पुणे – क्रेडाई महाराष्ट्र बांधकाम व्यावसायिक संघटनेतर्फे सुरू असलेल्या क्रेडाई महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरी काल पार पडली. कोल्हापूर विरुद्ध अहमदनगर, छ. संभाजीनगर विरुद्ध वर्धा, नागपूर विरुद्ध इचलकरंजी तर नांदेड विरुद्ध नवी मुंबई, रायगड असे एकूण 4 सामने झाले.
यात विजयी झालेले अनुक्रमे कोल्हापूर, छ. संभाजीनगर, नागपूर आणि नांदेड हे 4 संघ उपांत्य फेरीत दाखल झाले. उद्या छ. संभाजीनगर विरुद्ध नांदेड, कोल्हापूर विरुद्ध नागपूर असे दोन सामने रंगतील. यातून विजयी झालेल्या संघात दि. 26 नोव्हेंबर रोजी अंतिम लढत होईल. उपांत्य पूर्व सामन्यातील कोल्हापूर विरुद्ध अहमदनगर लढतीत कोल्हापूर संघाचा 8 गडी राखून विजय झाला. प्रथम फलंदाजी करत अ.नगर संघाने एकूण 10 षटकात 6 गडी राखून 74 धावा केल्या.
अ.नगर संघातील नंदन कामत यांनी 25 चेंडूत 39 धावा केल्या. परंतु त्यांना समर्पक साथ लाभली नाही. कोल्हापूर संघाच्या श्रीराम पाटील, प्रदीप भामल, अनंत मुरगुडे या गोलंदाजांनी प्रत्येकी एक गडी बाद करून अ.नगरला संघास रोखले. कोल्हापूरचे सचिन परांजपे यांनी 20 चेंडूत केलेल्या 32 धावा आणि नितीन अबदार यांनी 16 चेंडूत केलेली नाबाद 24 धावांची खेळी यामुळे कोल्हापूर संघाने अ.नगर संघावर 8 गडी राखून मात केली.
छ. संभाजीनगर विरुद्ध वर्धा सामन्यात छ. संभाजीनगर संघाचा 72 धावांनी विजय झाला. तर इचलकरंजी आणि नागपूर यांच्यात झालेल्या लढतीत नागपूर संघाने 9 गडी राखून विजय प्राप्त केला. यासह नांदेड आणि मुंबई – रायगड यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होऊन केवळ एक धावांनी नांदेड संघाने मुंबई संघावर विजय मिळवला.