शिक्रापूर -शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे मोरया हॉस्पिटल नावाने कोविड केअर सेंटर चालविणारा डॉक्टर बोगस असल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा शिक्रापूर येथे बनावट पद्धतीने हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर चालविणाऱ्या आणकी एका डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात प्रशासनाला यश आले आहे. याप्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे आहे.
रामेश्वर विठ्ठलराव बंडगर, गजानन विठ्ठलराव बंडगर, प्रशांत राजाराम मोरे, राहुल बाळासाहेब पवळे असे ताब्यात घेण्यत आलेल्यांची नावे आहेत. याबाबतची माहिती अशी की, शिक्रापूर येथे कोणतीही अधिकृत परवानगी नसताना आधार हॉस्पिटल नावाने कोविड सेंटर सुरू होते. करोना बाधित रुग्णांच्या नातेवाइकांना भीती दाखवून रुग्णांना या ठिकाणी दाखल करून घेतले जात होते.
अशी माहिती प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांना मिळाली. त्यानंतर तहसीलदार लैला शेख, गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दामोदर मोरे, तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे, शिक्रापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजिनाथ काशीद, शिक्रापूरचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, तलाठी अविनाश जाधव, आशिष पवार, पोलीस शिपाई प्रफुल्ल सुतार, कृष्णा व्यवहारे आदींनी त्या ठिकाणी धाव घेत पाहणी केली.
त्यावेळी हे हॉस्पिटल डॉ. निखील इंगळे यांच्या नावावर असून येथील रुग्णांवर रामेश्वर बंडगर हा व्यक्ती उपचार करत होता. तसेच या ठिकाणी 16 रुग्ण उपचार घेत असून प्रत्येकाकडून डॉक्टरने 50 हजार रुपये जमा करून घेतले आहेत. तर यापैकी फक्त पाच रुग्णांची कोविड तपासणी करण्यात आलेली आहे. 11 रुग्णांचे फक्त स्कॅन करून दाखल करून घेतले असल्याचे समोर आले आहे; मात्र याठिकाणी डॉ. निखील इंगळे नावाचा व्यक्ती कधीही आलेला नसल्याचे नागरिक तसेच रुग्णांच्या नातेवाइकांनी सांगितले.
यावेळी प्रशासनाने येथील सर्व रुग्णांना उपचारासाठी इतर ठिकाणच्या कोविड सेंटरमध्ये हलविले आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच आम्ही कारवाई करून चौघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी यावेळी सांगितले आहे.
हॉस्पिटल आधार अन् चिठ्ठी साईधाम नावाने
कारवाई केलेल्या हॉस्पिटलचे नाव आधार हॉस्पिटल आहे. येथे रुग्णांना औषधोपचारासाठी देण्यात येणारी चिठ्ठी मात्र साईधाम नावाने देण्यात येत असल्याचे अनेक रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांकडून समोर आले आहे.
बोगस डॉक्टरला कोणाचे अभय?
शिक्रापूर येथे मागील पाच महिन्यांपूर्वी एका माजी सरपंचासह आदींवर खंडणी व अपहरण प्रकरणी आधार हॉस्पिटल चालविणारे रामेश्वर बंडगरने गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे डॉक्टरच बोगस असून त्याला नेमके कोणाचे अभय मिळत आहे, अशी चर्चा आता परिसरात रंगली आहे.