बारामती (प्रतिनिधी) – बारामती शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असून शासनाने रुग्णांना औषध उपचार व सोयीसुविधा पुरवाव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष ॲड. विनोद जावळे यांनी दिला आहे.
बारामती शहर व तालुक्यात कोरूना चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. दररोजची रुग्ण संख्या जवळपास 400 पर्यंत पोहोचले आहे. सद्य परिस्थितीमध्ये बारामतीतील शासकीय व खाजगी रुग्णालय तसेच कोविड केअर सेंटर मध्ये 3 हजार 500 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णांना उपचार होत असताना मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सुविधांचा वानवा जाणवत आहे.
फेविलो, फॅबिफ्लू गोळ्या, रेमडीसीव्हार इंजेक्शन व ऑक्सीजन उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्णांना प्राण गमवावे लागत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदनात म्हणले आहे. मागण्यांचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे अन्यथा आंदोलन खेळावे लागेल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विविध मागण्या –
शासकीय व खासगी रुग्णालयात फेविलो, फॅबिफ्लू गोळ्या, रेमडीसीव्हार इंजेक्शन व ऑक्सीजन उपलब्ध करण्यात यावा. खाजगी रुग्णालयातील मागणीनुसार रेमडीसीव्हार इंजेक्शन उपलब्ध करून द्यावेत.
खासगी रुग्णालयातील रुग्णांचे बिल महाराष्ट्र शासनाचे 31 ऑगस्ट 2020 चे मार्गदर्शक परिपत्रकानुसार आकारण्यात यावे.
रेमडीसीव्हार इंजेक्शन बाहेरून आणण्यास सांगणाऱ्या खाजगी रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी तसेच शासकीय व खाजगी रुग्णालयाचे स्ट्रक्चरल ऑडिट व ऑक्सिजन साठा करण्यासाठी असणारी व्यवस्था यांचे ऑडिट व तपासणी व्हावी.
शासकीय रुग्णालयात एच आर सिटी तपासणी व सिटीस्कॅन मशिन उपलब्ध व्हावेत. रेमडीसीव्हार इंजेक्शनचा काळाबाजार रोखावा. कोरोणा संसर्ग आजार नियंत्रणत आणण्यासाठी आयोजित बैठकांमध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी यांना सामावून घ्यावे.