ज्ञानेश्वर फड/एम. डी. पाखरे
आळंदी, दि. –
ज्ञानेश्वरापाशीं आनंदी आनंद ।
नाचतो गोविंद कीर्तनासी ॥
दशमीच्या दिवशीं महोत्सव अलंकापुरीं ।
करितसे हरि आवडीनें ॥
हरिदिन जागरण होत सारी रात्र ।
बसोनि पंढरीनाथ स्वअंगे ॥
द्वादशी पुण्यतिथी केली ज्ञानेश्वरा ।
पांच दिवस सारा महोत्सव ॥
अमावस्ये दिवशीं केला गोपाळकाला ।
मग वैष्णवाला लाभ मोठा ॥
नामा म्हणे देवा आनंद अलंकापुरी ।
कांही दिवस हरि राहा येथें ॥
श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांचे समकालीन संत नामदेव महाराज यांच्या अभंगप्रमाणे माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी देव, संत, महात्मे उपस्थित होते. त्याचप्रमाणे शुक्रवारी (दि. 8) अलंकापुरीत विविध ठिकाणाहून लाखो वारकरी भाविक दाखल झाले आहेत. गेली 4 दिवसांपासून दररोज हजारो भाविकांचे आळंदीत आगमन होत आहे. यावर्षी स्मार्त एकादशी (दि. 8) आणि भागवत एकादशी (दि.9) लागोपाठ आल्या आहेत. मात्र वारकरी संप्रदायात भागवत एकादशी कार्तिकी एकादशी यात्रा उत्सव म्हणून साजरी केली जात आहे.
वारकर्यांच्या दिंड्या सातत्याने आळंदीत दाखल होत आहेत. आळंदीत येताच वारकरी नगर प्रदक्षिणा करून आपल्या मुक्कामी विसावत होते. त्यामुळे प्रदक्षिणा रस्त्यावर वारकर्यांच्या दिंड्या आणि इतर भाविकांची वर्दळ यामुळे प्रदक्षिणा रस्त्यावर सकाळी संध्याकाळी अलोट गर्दी होती. यासह गोपाळपुरा, वडगाव रोड, मरकळ रोड, देहूफाटा, मोशी रोड आदी ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. तसेच लाखो भाविक हे आज रात्री आणि उद्या सकाळपर्यंत आळंदीत पोहोचणार आहेत. शनिवारी (दि. 9) आळंदीत 5 लाखापेक्षा जास्त भाविक जमण्याची शक्यता आहे.
दर्शनासाठी 6 तासांपेक्षा अधिक वेळ
आळंदी पंचक्रोशीत भजन, कीर्तन आदी वारकरी संप्रदायिक कार्यक्रम सुरू आहेत. सर्वत्र हरीनामाचा गजर होत असून भक्तीमय वातावरण आहे. माऊली मंदिर परिसरात प्रदक्षिणा मार्ग, महाद्वार परिसर, इंद्रायणी घाट परिसरात भाविकांची अलोट गर्दी आहे. समाधी दर्शन रांग इंद्रायणी घाटापलीकडील दर्शन मंडपात गेली असून दर्शनासाठी 6 तासांपेक्षा अधिक वेळ लागत असल्याचे भाविकांनी सांगितले.
माऊली मंदिरात सजावटीची लगबग
शनिवारी कार्तिकी एकादशी आळंदीची मुख्य यात्रा आणि सोमवारी होणार्या माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी माऊली मंदिरात आकर्षक फुलांची सजावट केली जात आहे. रंगीबेरंगी फुलांच्या साह्याने माऊलींची, विठ्ठल रुख्मिणीची प्रतिमा साकारली जात आहे. त्याचे सजावटीच्या कामाची माऊली मंदिरात लगबग सुरु होती.
आज होणारे कार्यक्रम –
कार्तिक वद्य द्वादशी, भागवत एकादशी (कार्तिकी एकादशी यात्रा) दिनी रात्री 12. 30 ते पहाटे दोन वाजाता 11 ब्रह्मवृंदांच्या वेद घोषात पवमान अभिषेक व दुधारती, दुपारी 12 ते 12.30 महानैवेद्य, दुपारी 1 वाजता श्रींची नगर प्रदक्षिणा, रात्री 8.30 धुपारती, रात्री 12 ते 2 श्री मोझे यांच्यातर्फे जागर.