धामणी -शिरदाळे घाटात बटाट्याच्या गोण्यांनी भरलेला टेम्पो उलटला
लोणी धामणी – शिरदाळे ते धामणी (ता. आंबेगाव) घाटात रविवारी (दि. 4) मध्यरात्री भीषण अपघात झाला. यामध्ये आयशर टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून दैव बलवत्तर म्हणून चालक आणि वाहक तसेच बटाटा व्यापारी यात बचावले आहेत.
गुळाणीवरून बटाट्याची भरलेला हा टेम्पो श्रीगोंदा या ठिकाणी चालला असता मध्यरात्री एकच्या सुमारास शिरदाळे घाटात उलटला. यात भूषण धवण (वय 21), सुधीर धोत्रे (वय 39), शुभम कोथिंबिरे (वय 30, तिघेही रा. श्रीगोंदा) हे थोडक्यात बचावले. मात्र टेम्पोचे मोठे नुकसान झाले. अशी माहिती नजीक राहायला असणारे सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब बोर्हाडे, विक्रम बोर्हाडे, सीमा बोर्हाडे यांनी दिली. गेल्या वर्षभरातील हा तिसरा ते चौथा मोठा अपघात आहे.
शिरदाळे ग्रामपंचायत, धामणी ग्रामपंचायत यांच्या वतीने वारंवार सिमेंट कठडे बसवण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाला करण्यात येत असून त्याकडे दुर्लक्ष केले जात असून आता पुन्हा दोनही ग्रामपंचायच्या वतीने आपणास निवेदन देण्यात येणार असून कोणाचा जीव जाण्याची वाट सार्वजनिक बांधकाम विभाग पाहत आहे का ? असा संतप्त सवाल धामणी गावच्या सरपंच रेश्मा बोर्हाडे, शिरदाळे गावच्या सरपंच जयश्री तांबे, उपसरपंच बिपीन चौधरी तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्यांनी केला आहे.
या रस्त्याचे काम झाल्यापासून या रस्त्याने वर्दळ वाढली आहे. शिरदाळे येथील शाळेतील मुलं, महिला मजूर, शेतकरी यांची कायमच वर्दळ या रस्त्याला असते. आम्ही दोनही ग्रामपंचायत सार्वजनिक बांधकाम विभागाला पुन्हा निवेदन देणार असून आता तरी दखल घेऊन हे काम मार्गी लावावे.
-रेश्मा बोर्हाडे, सरपंच धामणी