शिरूर -शिक्रापूर पोलिसांनी मंगलदास बांदल यांना फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करून शिरूर येथे आणले; मात्र या प्रकरणातील इतर आरोपी जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल आणि त्यांचा मित्र मोहन चिखले यांना अटक का केली नाही?
की त्यांना शिक्रापूर पोलिसांनी अभय दिले असा प्रश्न उपस्थित होत आहे. तरी आता पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक इतर आरोपींवर कारवाई करणार की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
शिरूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांना खोटे कुलमुखत्यारपत्र, बनावट कागदपत्र तयार करून बॅंकेतून सव्वाकोटी रुपयांचे कर्ज काढून ते
थकवून अडीच कोटी रुपये झाल्यानंतर यातील फिर्यादी मांढरे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.26) फिर्याद दिल्यानंतर बांदल यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांना लगेचच शिरूर पोलीस कोठडीत ठेवण्यात आले.
बांदल यांना अटक झाल्यानंतर त्यांची पत्नी जिल्हा परिषद सदस्य रेखा बांदल, त्यांचे मित्र मोहन चिखले हे शिरूर पोलीस ठाण्याच्या आवारात उभे होते. यावेळी शिक्रापूर पोलिसादेखत रेखा बांदल या मंगलदास बांदल यांच्याशी बातचीत केली.
तसेच मोहन चिखले पोलिसांसमोरच त्या ठिकाणी फिरत होते. दरम्यान, रेखा बांदल या कारमध्ये निघून गेल्या तर चिखले तिथेच फिरत होते.
बांदल यांना शिरूर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर या गुन्ह्यातील इतर आरोपी पोलिसांसमोर हजर होते, त्यांच्या देखत मंगलदास बांदल यांच्याशी बातचीत करीत होते; परंतु अटक आणि आरोपीबाबत पोलिसांनी गोपनीयता बाळगली होती.
तर प्रेस नोटमध्ये एकाच आरोपीचे नाव दिले होते; परंतु त्यानंतर इतर आरोपींची नावे जाहीर झाल्यानंतर आरोपी आणि पोलीस समोरासमोरच असतानाही त्यांना अटक झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
आरोपी मंगलदास बांदल यांच्यासोबत असलेल्या व्यक्ती या इतर आरोपी असल्याचे नंतर समजले. अद्याप इतर आरोपींना अटक केलेली नाही.
– हेमंत शेडगे, प्रभारी निरीक्षक, शिक्रापूर पोलीस ठाणे