पुणे जिल्हा: बारामती शहरात 1700 घरे पाण्याखाली; तर 104 घरांची पडझड

बारामती -परतीच्या पाऊसाने रुद्रावतार धारण केल्याने बरमातीकरानवर अश्रू ढाळण्याची वेळ आली आहे. हजारो घरात व व्यापारी गाळ्यांमध्ये शिरलेले पाणी काढताना बारामतीकरांची दमछाक झाली.

अनेकांच्या संसारावर पाणी फिरवले. विजेचे खांब कोसळल्याने वाढीव हद्दितील काही भाग अंधारात गेला आहे. परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी प्रशासन व नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत. तरी बारामतीकरांना पूरपरिस्थितीतून मुक्‍त करताना यंत्रणा तोकडी पडत आहे. त्यामुळे अजूनही शहरातील काही भाग पाण्याखाली आहे तर काही भागात अंधार आहे.

तहसीलदार विजय पाटील म्हणाले की, बारामती शहर व तालुक्‍यात 1 हजार 768 घरे पाण्याखाली गेली आहेत. 104 घरांची पडझड झाली आहे. शहरातील जळोची येथे एकाचा मृत्यू झाला आहे.तालुक्‍यातील 8 हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहे.

परिस्थिती नियंत्रणाखाली
मुख्याधिकारी किरणराज यादव म्हणाले की, शहरातील घरे तसेच व्यापारी गाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. नगरपालिकेचे कर्मचारी तसेच नागरिकांच्या सहकार्याने सलग दोन दिवसांच्या परिश्रमानंतर परिस्थिती नियंत्रणाखाली आली आहे. सध्या नदीपात्रातील पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

नदीपात्रालगत असलेल्या स्मशानभूमी तसेच गॅसदाहिनीचे नुकसान झाले. काही ठिकाणी भिंती कोसळल्या आहेत. आंबेडकर वसाहतीमधील जळोचीतील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

ओढे, नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करून पाण्याला नैसर्गिक वाट करून दिल्याने शहरातील पाणी कमी होत आहे. महसूल विभागाच्या वतीने पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. नगरपालिकेचे कर्मचारी मदतीला आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.