नवरात्रीच्या पूर्वसंध्येला स्त्री जन्माचे अनोखे स्वागत

शिक्रापूरच्या मुस्लीम समाजातील शेख कुटुंबीयांचा आदर्शवत उपक्रम


शिक्रापूर (पुणे) –
येथील मुस्लीम समाजातील शेख कुटुंबीयांनी नवरात्र उत्सवाच्या आदल्या दिवशी मुलीच्या जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. लेक वाचवा मुलगी वाचवा, तसेच बेटी धन की पेटी असा अनोखा आणि आगळावेगळा संदेश समाजात दिला आहे.

शिक्रापूर येथील नसीम व शेरखान शेख या दाम्पत्याला मुलीचा जन्म झाल्याचे समजताच शेख कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी शेख कुटुंबीयांनी फटाके वाजवीत पेढे वाटून आंदोत्सव साजरा केला. इतकेच नव्हे तर मुलीचे चुलते समीर शेख यांनी आपल्या नवजात पुतणीला वापरासाठी लागणारी भांडी चांदीची आणली. मुलीला हॉस्पिटलमधून घरी आणताना चुलते समीर व आमीर शेख यांसह शेख कुटुंबीयांनी फुलांची गाडी सजवून आणि रस्त्याने फटाके वाजवून रस्त्यावर फुलांच्या पायघड्या घालून मुलीला घरात आणले. चुलती सलमा शेख, आर्शिया शेख, मावशी निलोफर अन्सारी, आत्या आरजू शेख आदींनी घरामध्ये फुलांची, फुग्यांची सजावट केली. कुटुंबीयांनी मुलीच्या जन्माचा साजरा केलेला आनंदोत्सव पाहून शिक्रापूर येथील अष्टविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. शरद लांडगे यांनी हॉस्पिटलचे बिल देखील अगदी नाममात्र स्वरुपात घेऊन शेख कुटुंबीयांचे आभार मानले.

आमच्या घरात मुलगी जन्माला यावी, हे आमचे स्वप्न साकार झाले आहे. यामुळे मोठा आनंद झाला. मुलगी होऊनदेखील पेढेच वाटले आहेत. अशाच प्रकारे समाजाने मुलीचा स्वीकार करून मुलीच्या जन्माचे स्वागत करावे.
-जरीना व सिकंदर शेख, मुलीचे आजी-आजोबा

शिक्रापूर येथे हॉस्पिटलमधून रुग्णांना सेवा देत असताना अनेकदा मुलगी जन्माला आली म्हणून पालक नाराजी व्यक्त करत असतात. मात्र मुलगी जन्माला आल्यानंतर आनंदोत्सव साजरा करणारे शेख कुटुंबीय आम्ही पाहिले आहे. त्यांचा इतरांनीही आदर्श घ्यावा.
-डॉ. शरद लांडगे, संचालक अष्टविनायक हॉस्पिटल शिक्रापूर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.