पुणे – महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागातील उपायुक्ताने तब्बल एक कोटीची अपसंपदा गोळा करून ठेवल्याची माहिती चौकशीमधून समोर आली. याप्रकरणी उपायुक्तासह त्याच्या पत्नीविरोधात लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडून (ऍन्टी करप्शन) कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय भास्कर लांडगे (वय 49) आणि शुभेच्छा विजय लांडगे (वय 43) असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय लांडगे हे पुणे महानगरपालिकेतील आकाशचिन्ह विभागात उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. लांडगे यांनी चुकीच्या मार्गाने असंपदा कमविल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली होती. त्यानुसार 2019 पासून याप्रकरणी लांडगे यांच्या संपत्तीची चौकशी सुरू होती.
या चौकशीमध्ये विजय लांडगे आणि त्यांची पत्नी शुभेच्छा यांच्या नावावर एकूण 1 कोटी 2 लाख 60 हजार एवढी असंपदा मिळून आली. म्हणजे लांडगे यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा 31.59 टक्के संपदा अधिक असल्याचे चौकशीतून समोर आले आहे.
दरम्यान, या चौकशीमध्ये लांडगे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर पुणे शहर 4 तर नाशिक जिल्ह्यात 1 अशी 5 ठिकाणी मालमत्ता आहे. त्यानुसार सध्या राहत असलेल्या घराची आणि या सर्व मालमत्तेच्या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून झडती सुरू आहे. त्यामुळे या अपसंदेमध्ये आणखीन किती वाढ होणार हे अहवालातून समोर येईल. लांडगे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 13(1)(ब)सह13(2) व भा. द. वि. कलम 109 नुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधिक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उप अधीक्षक शितल घोगरे करीत आहेत.