पुणे –“गणेश बिडकर यांनी स्वत:च्या प्रभागासह महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, भाजप शहराध्यक्ष, औंध, बाणेर बालेवाडी येथील प्रभागांसह 50 उमेदवारांची नावे 24 तासांत जाहीर करावीत. त्यांना 25 लाख रुपयांचा धनादेश आपण देऊ,’ असे आव्हान देत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सभागृह नेते गणेश बिडकर यांना प्रत्युत्तर दिले आहे.
प्रभाग रचना जाहीर होताच भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांत कलगीतुरा रंगला आहे. “राष्ट्रवादीने प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप करत प्रभागांची मोडतोड केली आहे. भाजपचा धसका घेतल्यानेच हा प्रकार झाला असून राष्ट्रवादी 122 जागांचा दावा करत असली, तरी त्यांनी 100 उमेदवार तरी आहेत का, हे सिद्ध करण्यासाठी उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करावीत,’ असे आव्हान गणेश बिडकर यांनी दिले होते. त्याला जगताप यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.
जगताप म्हणाले, “मागील निवडणुकांत भाजपने कशा पद्धतीने प्रभाग रचना केली होती, याची कबुली बिडकर यांनी दिली. शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दबदबा आहे. त्यामुळे बिडकर घाबरत आहेत. भाजपने पाच वर्षांत काहीच केले नाही. त्यामुळे आता प्रभाग रचनेचे कारण पुढे करत आहेत.’
भाजपने आमची काळजी करू नये : शिवसेना
‘राष्ट्रवादी आमच्यावर अन्याय करत आहे, असे आम्हाला सांगण्याची गरज नाही. आम्ही निवडणुकांसाठी समर्थ आहोत. आमच्यावर अन्याय आहे, असे भाजपला वाटत असेल, तर त्यांनी आमच्या सोबत काय केले, हे आधी पाहावे. आमची काळजी करण्याची गरज नाही,’ अशा शब्दांत शिवसेनेचे प्रवक्ते बाळा ओसवाल यांनी भाजपवर टीका केली आहे. सभागृह नेते बिडकर यांनी प्रभाग रचनेत राष्ट्रवादीने कॉंग्रेस व शिवसेनेवर अन्याय केल्याचे वक्तव्य केले होते. त्याला ओसवाल यांनी प्रत्युत्तर दिले आहे.