पुणे- महापालिकेपाठोपाठ आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहे. जिल्हा परिषद सदस्यांसाठी गट आणि पंचायत समित्यांसाठी गणांची रचना तयार करून ते दि.10 फेब्रुवारी रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील सदस्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार नुकताच अध्यादेश जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार पुणे जिल्हा परिषदेमधील सदस्यांची संख्या 7 ने वाढणार असून 82 तर पंचायत समित्यांमधील सदस्यांची संख्या 14 ने वाढणार 164 इतकी होणार आहे. राज्य निवडणुक आयोगाने दि.2 फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाला गण व गटांची रचना तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता राज्य निवडणूक आयोगाने गण व गटांची रचना तयार करून उपजिल्हाधिकारी अथवा तहसीलदार यांनी हा आराखडा येत्या गुरुवारी सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.