विश्रांतवाडी -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष, ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व माजी नगरसेवक महेंद्र पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त “नगरसेवक महेंद्र पठारे युवा मंचच्या’वतीने दि.8 डिसेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात पहिल्या दिवशी लहान मुलांसाठी बालजत्रा या कार्यक्रमाने झाली. या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन माजी नगरसेवक महेंद्र पठारे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारची खेळणी ठेवण्यात आली होती. यामध्ये टॉयट्रेन, जम्पिंग जॅक, मिकी माउस, शुटींग गन, डान्स स्पर्धा तसेच खाऊ गल्लीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शेकडो बालगोपाळांनी विविध खेळांचा आनंद लुटला. दुसऱ्या दिवशी प्राध्यापक वसंत हंकारे यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. माजी नगरसेवक महेंद्र पठारे यांनी शाल व श्रीफळ देऊन प्राध्यापक वसंत हंकारे यांचा सत्कार केला. तसेच दि. 10 डिसेंबरला गौतमी पाटील आयोजित “म्युझिकल ऑर्केष्ट्रा’ व दि. 11 डिसेंबरला महिलांसाठी “होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युवा मंचच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी माजी नगरसेवक महेंद्र पठारे, मतदारसंघ युवक अध्यक्ष किरण खैरे, स्वप्निल पठारे, निखील गायकवाड, विनोद पठारे, चेतन येवले, सुहास तळेकर, बंटी मांजरे, शुभम सैद, अभिजित शहा, मयूर वाघमारे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.