पुणे – मोलमजुरी करणाऱ्या तरुणाचा गळा दाबून खून केल्याची घटना काल रात्री लोणी काळभोर गावात घडली आहे. विजय उर्फ गुलशन रोहिदास मोरे (वय 23) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ रोहित मोरे (वय 25) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे कुटुंबीय लोणी काळभोर गावात राहायला आहे. विजय उर्फ गुलशन मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. त्याला दारूचे व्यसन होते. काल रात्री तो घरातून बाहेर गेल्यानंतर पुन्हा आला नाही. त्यामुळे त्याचा भाऊ रोहित शोध घेत असताना विजय उद्यानाजवळ बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्यानंतर पोलीस आणि स्थानिकांनी त्याला ससून रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले.
उत्तरीय तपासणीत विजयचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.