नागपूर – गडचिरोलीच्या जंगलात पोलिसांच्या विशेष पथकाने नक्षलवाद्यांचा एक अड्डा उद्धवस्त केला. तिथून काही स्फोटके जप्त करण्यात आली. नक्षलवाद्यांच्या अस्तित्वाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रविवारी मोहीम हाती घेतली. त्यावेळी पोलीस पथकाला पाहून नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला पोलिसांनी प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये काही काळ चकमक झडली.
मात्र, पोलिसांच्या जोरदार माऱ्याला घाबरून नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित भागात शोध घेतल्यावर एक आयईडी स्फोटक आणि कुकर बॉम्ब आढळला. ती स्फोटंक तातडीने निकामी करण्यात आली. पळून गेलेल्या नक्षलवाद्यांच्या शोधासाठी पोलीस पथकाने काही काळ मोहीम राबवल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.