पुणे – कर्वेरोड येथील एका आयडीया वोडाफोन स्टेअरमध्ये चोरी करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. अमर गजानन सुर्यवंशी (वय. 48 रा. शास्त्रीनगर, मुठेश्वर कॉलनी, कोथरुड) असे आरोपीचे नाव आहे. यावेळी त्याच्या ताब्यातून चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी, 27 वर्षीय व्यवस्थापक महिलेने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध स्टोअरमध्ये चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा गुन्हयात सहभाग असल्याने त्यास डेक्कन पोलीस स्टेशन पुणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला 13 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
13 ते 14 जानेवारी दरम्यान ऑफीस बंद असताना अज्ञात चोरट्याने शटरचे लॉक तोडुन त्यावाटे आत प्रवेश केला. त्यानंतर ऑफीसमधील लॅपटॉप, मोबाईल फोन कॅमेरा असा एकवीस हजार पाचशे रुपयाचा माल चोरुन नेला होता.
गुन्हे शाखेचे पथक तपास करत असताना कर्मचारी शशिकांत दरेकर व दत्ता सोनवणे यांना चोरीत सुरक्षारक्षकाचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून अमर सुर्यवंशी याला ताब्यात घेतले. त्याचेकडे अधिक तपास करता तो त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून सात वर्षापासुन काम करत असल्याचे सांगितले. ही कामगिरी पोलिस निरीक्षक शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी यांच्या पथकाने केली.