पुणे – जमिनीबाबत सर्वोच्च न्यायालयात दावा प्रलंबित असताना भूमि अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जमिनीची मोजणी करुन दिली तसेच महापालिका अधिकाऱ्यांनी त्यावर मंत्रा 29 गोल्ड कोस्ट डेव्हलपर्स एलएलपी या प्रकल्पचा प्लॅन पास करुन दिल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकासह महापालिका अधिकारी व भूमि अभिलेखा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी विशाल सत्यवान खंडागळे (35, रा. रामवाडी, नगर रोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन रोहीत घनश्याम गुप्ता (60 ), मुकेश घनश्याम गुप्ता (55 ), किशोर पोपटलाल गाडा (45 ), निलेश पोपटलाल गाडा (40 , सर्व रा. मेट्रोपोल, बंडगार्डन रोड) तसेच पुणे महानगर पालिका व भूमि अभिलेख कार्यालयातील अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 28 ऑगस्ट 2009 ते 4 मे 2021 दरम्यान घडला आहे.
पुणे महानगरपालिका आणि हवेलीच्या भुमी अभिलेख अधिक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अद्याप त्यांची नावे निष्पन्न झालेली नसल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल खंडागळे यांच्या बहिवाटीची सर्व्हे नं 29 मधील एकूण क्षेत्र 15 हजार 100 स्क्वेअर मीटर पैकी प्लॉट नं. 16, 20 आणि 21 क्षेत्र, 9 आर (गुंठे) या जागेची मंत्रा 29 गोल्ड कोस्ट डेव्हलपर्स एलएलपी चे भागीदार गुप्ता व इतरांनी येरवडा येथील भुमी अभिलेख कार्यालयात खोटी माहिती देऊन सर्व्हे नं. 29 ची मोजणी करुन घेतली.
या मिळकतीवर सर्वोच्च न्यायालयात दावा प्रलंबित असतानाही पुणे महानगरपालिका व भुमी अभिलेख अधीक्षक कार्यालय, हवेली येथील अधिकाऱ्याशी संगनमत करुन मंत्रा गोल्ड कोस्ट हा प्रकल्पाचा प्लॅन पास करुन घेतला. फिर्यादी यांची सर्व्हे नं. 29 मधील 15 हजार 900 स्क्वेअर मीटरपैकी प्लॉट नं.16 ,20 आणि 21 क्षेत्र 9 आर (गुंठे) धानोरी येथील जागा त्यांची आहे, असे भासवून ती बळकावून फसवणूक केली असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस उपनिरीक्षक सातपुते अधिक तपास करीत आहेत.