पुणे – लष्कर परिसरात एका सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. अज्ञात व्यक्तींनी डोक्यात कठीण वस्तूने वार करत खून केला. या गुन्हेगारावर तब्बल २५ गुन्हे दाखल होते. त्याच्यावर दोन वेळा तडीपारी आणि तीन वेळा महाराष्ट्र झोपडपट्टी प्रतिबंधक कायद्या (एमपीडीए )अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
यातून तो नुकताच बाहेर सुटला होता. त्यानंतर त्याने पुन्हा एक गुन्हा केला होता. प्रतिस्पर्धी टोळीतील व्यक्तीने हा खून केल्याचा अंदाच पोलिसांनी वर्तवला आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा ५ जानेवारी रोजी त्याच्याच सहकाऱ्याने गोळ्या झाडून खून केला होता. यानंतर गुन्हेगारी वर्तुळात खळबळ माजली होती. त्या पार्श्वभूमीवर ही खूनाची घटनाही खळबळ माजवणारी आहे.
अरबाज उर्फ बबन इक्बाल शेख (रा.चुडामल तालिम, भवानी पेठ) असे मृत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याचा खून चार व्यक्तीनी केला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात २५ गुन्हे दाखल आहेत. त्याला एम.पी.डी.ए.अतंर्गत स्थानबध्द करण्यात आले होते. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास लष्कर पोलीस ठाण्यास एक कॉल आला.
भांडणातून एका व्यक्तीस मारहाण झाली असून तो जखमी अवस्थेत पडला असल्याचे सांगण्यात आले. त्या ठिकाणी मार्शल गेल्यावर शेख याच्या डोक्यात दगड किंवा अवजड वस्तूने मारहाण झाल्याने गंभीर जखमा झालेल्या दिसल्या. रुग्णवाहिका बोलावली असता, तो मृत असल्याचे आढळले. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील यांनी भेट दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, शेखला दोन वेळा तडीपार करण्यात आले होते. तर एमपीडीए अंतर्गत तीन वेळा स्थानबध्द केले गेले होते. दोन महिण्यापुर्वीही त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र त्याने ती उच्च न्यायालयाकडून रद्द करुन घेतली. आरबाज विरुद्ध खडक पोलिस ठाण्यात मारामारी, घातक शस्त्र बाळगणे, लहान मुलीचा विनयभंग,
जमाव जमवून घरात घुसून मारहाण करणे, धमकी, खंडणी यांसारखे गुन्हे आहेत. त्याच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी २०१७ मध्ये त्यास दोन वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र, त्याने संबंधीत आदेशाचे उल्लंघन केले. तसेच, त्याच्या दहशतीमुळे सामान्य नागरीक तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते.