पुणे – राष्ट्रीय तपास यंत्रणेने(एनआयए) इस्लामीक स्टेटशी(आयसिस) संबंधीत एका डॉक्टरला गुरुवारी कोंढव्यातून अटक केली. त्याच्या घराच्या झडतीत इस्लामीक स्टेटशी संबंधीत माहिती हस्तगत करण्यात आली. ही माहिती इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या स्वरुपात होती. हा डॉक्टर इस्लामीक स्टेटच्या महाराष्ट्रातील मॉड्युलचाच एक भाग आहे. याप्रकरणी आजवर पाच जणांना एनआयएने अटक केली आहे.
एनआयएने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, डॉ. अदनानली सरकार (43) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्या घराच्या झडतीमध्ये इलेक्टॉनिक्स गॅझेट, कागदपत्रे सापडली. त्याचा थेट संबंध इस्लामिक स्टेटशी असल्याचे उघड झाले. इस्लामिक स्टेटच्या हिंसक कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करणारे साहित्य त्यामध्ये होते.
जेणेकरुन तरुण इस्लामिक स्टेटमध्ये सामिल होतील. आरोपींनी वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या आयसिसच्या दहशतवादी कारवाया पुढे नेण्याचा कट रचला होता. जसे की इस्लामिक स्टेट (IS), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (ISIL), इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सीरिया (ISIS), दाईश, इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रांत (ISKP) इसीस विलायत खोरासान, इस्लामिक स्टेट ऑफ
इराक आणि शाम खोरासान (ISIS-K) अशी ही संघटनांची नावे आहेत.
यामाध्यमातून देशाची एकता, अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्व बिघडवण्याचा प्रयत्न आरोपी करत होते. या संघटनांच्या माध्यमातून आयसिस भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या तयारीत होते. एनआयएच्या तपासानुसार “महाराष्ट्र आयसिस मॉड्यूल’ प्रकरणातील ही पाचवी अटक आहे. यापुर्वी एनआयएने तीन जुलै 2023 रोजी मुंबई, ठाणे आणि इतर परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध घेतल्यानंतर चौघांना अटक केली होती. मुंबईतून तबिश नासेर सिद्दीकी, पुण्यातून जुबेर नूर मोहम्मद उर्फ शेख अबू नुसैबा आणि ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक करण्यात आली आहे.