पुणे – दिवाळी निमित्त हडपसर येथील मंडई परिसरात दुचाकी घेऊन आलेल्यांनी त्यांची दुचाकी पार्क केल्यानंतर दुचाकी मालक कोठे चालला आहे यावर पाळत ठेवून दुचाकी चोरणारे रॅकेट हडपसर पोलिसांनी उध्वस्त केलेे. याप्रकरणी तिघांना अटक करताना त्यांच्याकडून चोरीच्या 13 महागड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडे करण्यात आलेल्या तपासात मौजमजेसाठी ते दुचाकी चोरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
युनुस निजाम मुल्ला (25, रा. सय्यदनगर, हडपसर, मूळ रा. उस्मानाबाद), हनुमंत शंकर वाकडे (22, मु. पो. आलुर ता. उमरगा जि. उस्मानाबाद), दीपक उर्फ खंडू तात्यासाहेब कटकधोंड (24, रा. केसर जावळा, जि. उस्मानाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी अल्पवयीन मुलाला देखील हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत भाजीपाला मार्केट, बाजारपेठ, मॉल असे असून दिवाळी सणाच्या अनुषंगाने पोलिस ठाण्याच्या हद्दीत खरेदीसाठी येणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. त्यातच दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी तपास पथकातील सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड, उपनिरीक्षक सौरभ माने दुचाकी चोरीच्या अनुषंगाने काम करत असताना पोलिस अमंलदार शाहीद शेख व प्रदीप सोनवणे यांना संशयित आरोपींबाबत माहिती मिळाली.
एक अल्पवयीन मुलगा व त्याचे साथीदार दुचाकी चोरून सोलापूर महामार्गाने जात असल्याचे समजले. परंतु, ते कोठे राहतात याची माहिती मिळाली नव्हती. मिळालेल्या बातमीच्या आधारे पथकातील अमंलदार समीर पांडुळे, प्रशांत दुधाळ प्रशांत टोणपे यांनी तांत्रिक विश्लेषणावरून एक अल्पवयीन मुलगा आणि त्यांचे साथीदार दुचाकी टेहाळणी करताना आढळले. त्यानंतर त्यांना पकडण्यासाठी आरोपी ज्या मार्गाने येतात अशा फुरसुंगी येथील सार्वजनिक शौचालयाजवळ सापळा रचून एका अल्पवयीन आरोपीसह चौघांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी आपली टोळी बनवून हडपसर, वानवडी, स्वारगेट, फरासखाना भागात गाड्यांची टेहाळणी करून दुचाकी चोरल्याचे सांगितले. गाडीची टेहाळणी करण्याकरिता अल्पवयीन मुलाला पुढे पाठवून गाडी पार्क केलेला व्यक्ती कोठे जात आहे हे पाहून तो गेल्यावर ती दुचाकी आरोपी बनावट चावीच्या आधारे चोरत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडील तपासात 5 लाखाच्या 13 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
त्यांनी हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सात, स्वारगेट, फरासखाना तसेच वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक असे दहा गुन्हे उघडकीस आणताना दुचाकी चोरीचे रॅकेट हडपसर पोलिसांनी उध्वस्त केले. पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ निरीक्षक अरविंद गोकुळे, दिगंबर शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड, उपनिरीक्षक सौरभ माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.