नवी दिल्ली – देशाच्या वीज वापरात ऑक्टोबर महिन्यात 4.8 टक्के इतकी वाढ होऊन हा वापर 114 अब्ज युनिट इतका झाला आहे. सन 2019 च्या ऑक्टोबर महिन्यात देशातील वीज वापर 97.84 अब्ज युनिट इतका होता. तर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात देशातील विजेचा वापर 109 अब्ज डॉलर्स इतका झाला होता.
वीज वापरातील वाढीमुळे देशातील उत्पादन व निर्मिती क्षेत्रातील व्यवहार आता सुरळीत होऊ लागल्याचे संकेत मिळाले आहेत. येत्या काही काळात विजेचा वापर आणखी वाढेल असेही संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे.
दरम्यान, कोळसा टंचाईची स्थितीही आता सुधारत असून वीज उत्पादन करणाऱ्या प्रकल्पांमध्ये आता पुरेसा साठा उपलब्ध झाला आहे. देशातील करोना लॉकडाऊन स्थितीमुळे बहुतेक सारे व्यवहार ठप्प होते.
आता देशातील बहुतेक सारे व्यवहार अनलॉक झाले असल्याने वीज वापर वाढणे ही अगदीच स्वाभाविक बाब मानली जात असली तरी केवळ 4.8 टक्के हे वाढीचे प्रमाणही फारसे समाधानकारक नाही. येत्या काही काळात मात्र हा वापर मोठ्या प्रमाणात वाढेल अशी आशा आहे.