पुणे – सराईत गुन्हेगार बंटी पवार गँगमधील एका गुन्हेगारास पिस्तूल आणि दोन काडतूसांसह गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून ५० हजार ८०० रुपयांचे शस्त्र हस्तगत करण्यात आले. टोळी प्रमुख बंटी पवार सध्या मोक्काच्या गुन्हयात कारागृहात आहे. (Pune Crime: Criminal from Bunty Pawar gang arrested with pistol)
ओमकार विनोद पवार (२५ , रा. अप्पर बिबवेवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. बंटी पवार गँगमधील तो सराईत गुन्हेगार आहे.
शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तालयातून गुन्हे करणारे गुन्हेगार, पाहिजे फरारी व तडीपार यांची तपासणी करुन त्यांचेविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांनी सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ आणि अंमलदार यांचे एक पथक तयार केले आहे.
पथकामधील पोलीस हवालदार उज्वल मोकाशी व संजय जाधव यांना मिळालेल्या खबरीच्या आधारे, स्वारगेट पोलीस स्टेशनचे हद्दीत गुलटेकडी परिसरात सापळा रचण्यात आला. तेथे ओमकार विनोद पवार याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अंगझडतीत एक पिस्तूल दोन जिवंत काडतुसांसह मिळून आले. श्स्त्र जप्त करुन स्वारगेट पोलीस स्टेशन येथे आर्म ॲक्टनूसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, उप आयुक्त(गुन्हे) अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, संजय जाधव, शंकर नेवसे, प्रमोद कोकणे, साधना ताम्हाणे, विनोद चव्हाण, गणेश थोरात, पुष्पेद्र चव्हाण व नागेश राख यांच्या पथकाने केली आहे.