पुणे – शहरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. धनकवडी भागात रिक्षा प्रवासी युवकाला रिक्षाचालक आणि साथीदाराने मारहाण करून लुटल्याची घटना घडली. रिक्षाचालक आणि साथीदार युवकाकडील दोन लॅपटॉप घेऊन पसार झाले.
याबाबत प्रवासी युवकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार युवक मूळचा पालघरचा आहे. कामानिमित्त तो पुण्यात आला होता. रविवारी (२७ जून) रात्री अकराच्या सुमारास तो कात्रज परिसरातून रिक्षाने स्वारगेट एसटी स्थानकाकडे निघाला होता. तळजाई पठार भागात आनंद भवन सोसायटीजवळ रिक्षाचालकाने रिक्षा थांबवली. त्यानंतर रिक्षाचालक आणि साथीदाराने युवकाला बेदम मारहाण केली. युवकाकडील ६० हजारांचे दोन लॅपटॉप लांबवून रिक्षाचालक आणि साथीदार पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे तपास करत आहेत.
दरम्यान, वाघोली परिसरात टेम्पोचालकाला मारहाण करून चोरट्यांनी टेम्पो पळवून नेल्याची घटना घडली. याबाबत टेम्पोचालक रामराज वाकळ (वय ३४, रा. आष्टापूर फाटा, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टेम्पोचालक वाकळ रात्री साडेदहाच्या सुमारास आष्टापूर रस्त्याने निघाले होते. त्यावेळी जीपमधून आलेल्या चोरट्यांनी टेम्पो अडवले. वाकळ यांना मारहाण केली. त्यांच्याकडील मोबाइल संच आणि टेम्पो घेऊन चोरटे पसार झाले.