जयपूर – प्रेम कधी आणि कोणासोबत होईल, याचा काही नेम नाही. त्यातच विद्यार्थी आणि शिक्षकाचं गुरु-शिष्याचं नात पवित्र मानलं जातं. मात्र राजस्थानमध्ये एका शिक्षकाने या नात्याचं रुपांतर प्रेमात करून विद्यार्थिनीला घेऊन पोबारा केला आहे.
विद्यार्थिनीला अभ्यासाचे धडे देता देता एक शिक्षकाने तिला प्रेमाचेही धडे दिले. मग काय, एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालेल्या दोघांनी गावातून पोबारा केला. बारावीत शिकणारी विद्यार्थिनी आणि तिला इंग्रजीचे धडे देणारे शिक्षक यांचं बघता बघता एकमेकांवर प्रेम जडलं. याची त्यांनी घरच्यांना कल्पना दिली. मात्र दोघांच्याही घरून याला विरोध झाला. त्यानंतर या दोघांनीही गाव सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला.
बारावीत शिकणारी विद्यार्थिनी आणि तिचे शिक्षक यांचं गेल्या दोन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होतं. कुटुंबीयांना याची कल्पना होती. मात्र दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांची समजूत घालत त्यांना एकमेकांपासून वेगळं होण्याचा सल्ला दिला होता. मात्र दोघांनी मिळालेला सल्ला धुडकावून लावला.
घरच्यांचा विरोध पाहता, या दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघंही गाव सोडून पळून गेले. ते नेमके कुठं गेले, याची कुठलीही माहिती कुटुंबीयांना नाही. पळून गेलेले शिक्षक आणि विद्यार्थिनी लांबचे नातेवाईक असून त्यांची जात, गोत्र वगैरे एकच असल्याचं शिक्षकाच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.