Pune porsche accident । vishal agarwal : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील कल्याणीनगरमध्ये शनिवारी रात्री पोर्शे कारने दुचाकीला धडक देत एक युवक आणि एक युवती अशा दोघांचा जीव घेतला. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन कार चालक हा दारू पिऊन गाडी चालवत होता. वेदांत अग्रवाल असे अल्पवयीन आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणात बिल्डर वडिलांचा प्रभाव आणि पैशाच्या जोरावर एका अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत आणि ड्रायव्हिंग लायसन्स नसताना दोन जणांची हत्या केली. मात्र कठोर कारवाई न होता या मुलाला जामीन देण्यात आला. आणि 300 शब्दांचा निबंध लिहिण्यासारख्या अटींवर त्याला कोर्टातून सहज जामीन मिळाला यावरून जनतेत आक्रोश पहायला मिळाला आहे.
हे प्रकरण सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमांमध्ये गाजल्यानंतर दबावाखाली आलेल्या महाराष्ट्र सरकारने आता पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्या आहे. महाराष्ट्रातील पुणे पोलिसांनी आरोपीच्या वडिलांना अटक केली आहे. याशिवाय अल्पवयीन आरोपींना ज्या बारमध्ये दारू दिली जात होती, ते बारही सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
आज (22 मे) पोलीस त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात होते. यावेळी वंदे मातरम या संघटनेने आरोपीवर शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आंदोलकांना अडवलं आणि आरोपी बचावला. दरम्यान, कार्यकर्ते शाईफेक करू शकले नसले तरी त्यांनी पोलिसांच्या वाहनासमोर उभे राहून जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलक म्हणाले, “आरोपीला मोक्का या कायद्याअंतर्गत अटक केली पाहिजे. या बिल्डरवर याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत आणि आता त्याच्या मुलाने हा किळसवाणा प्रकार केला आहे. आम्ही या बिल्डरला धडा शिकवायला इथे आलो होतो. परंतु, पोलिसांमुळे तो बचावला. त्याच्यावर हल्ला करण्याचं आमचं उद्दिष्ट होतं. आम्ही त्याचा तोंड काळं करायला इथे आलो होतो.
कारण त्याच्या मुलाने दोन निष्पाप जीव घेतले आहेत. त्या मुलांचे आई-वडील आता त्यांच्या लेकरांना पाहू शकणार नाहीत. त्यामुळे या आरोपीचं तोंड काळं करून समाजाला दाखवायचं होतं. हा बिल्डर कोणत्यातरी छोटा राजन, दाऊद इब्राहिमसारख्या गुंडांच्या टोळीशी संबंधित असला तरी आम्हाला त्याने काही फरक पडत नाही. या गुन्ह्याला त्या मुलापेक्षा त्याचा बापच जास्त जबाबदार आहे.’ असं ते यावेळी म्हणाले.