पुणे – संशयावरुन ताब्यात घेतलेल्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. ही कारवाई समर्थ पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान केली. विष्णु भाऊराव कुंडगीर (22 रा.हडपसर स्टेशन पुणे, मुळ पत्ता मु.पो. खेडा तो. उदगीर, जिल्हा लातूर ) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, समर्थ पोलीस ठाण्यात एक दुचाकी चोरीला गेल्याची फिर्याद दाखल होती. त्याअनुषंगाने तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी करुन तपासणी सुरु केली होती. तपासणी दरम्यान कुंडगिर हा मंगळवार पेठ येथे सार्वजनिक रोडवर स्प्लेंडर दुचाकी घेवून संशयीत रीत्या उभा असलेबाबत दिसला. त्याचेकडे गाडीचे मालकीबाबत व कागदपत्राबाबत विचारणा केली असता तो असमाधानकारक व उडवाउडवीची उत्तरे देत होता.
यामुळे त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशीसाठी समर्थ पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गाडी समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे सांगितले. दाखल असलेल्या फिर्यादीचीच संबंधीत गाडी होती. तसेच त्याने दोन दिवसापूर्वी नानापेठ, पिपंरी चौक येथून एक काळया रंगाची स्प्लेंडर तसेच नानापेठ येथून ऍक्टीवा चोरल्याचे सांगितले. त्याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल आहे.
सदरची कामगिरी उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, पोलीस अंमलदार संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, निलेश साबळे, विठ्ठल चोरमले, महेश जाधव, शुभम देसाई, सुभाष मोरे, श्याम सुर्यवंशी, यांनी केली आहे.