पुणे- राष्ट्रीय घोडेस्वार असलेल्या तरूणीने इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड सिटीतील मधुवंती इमारतीत घडली. श्रीया गुणेश पुरंदरे (वय १७, रा. डी- मधुवंती, नांदेड सिटी) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे.
श्रीया पुरंदरे हिच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास गॅलरीत व्यायाम करणारे अभिजीत देशमुख यांना काहीतरी जोरात पडल्याचा आवाज आला. त्यांनी खाली पाहिले असता त्यांच्या मुलीच्या वर्गात शिकणारी श्रीया पडली असल्याचे त्यांना दिसले. अभिजीत यांनी तातडीने ही महिती हवेली पोलीस ठाण्याला दिली. श्रीया ही नॅशनल हॉर्स रायडर होती.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीया ही अत्यंत हुशार मुलगी होती. तसेच तिच्या घरातील वातावरणही खेळीमेळीचे होते. श्रीयाच्या वडीलांची हॉर्स रायडींग अॅकॅडमी आहे. त्यामध्ये लहानपणापासून ती हॉर्स रायडींगचे धडे घेत होती. राज्य व राष्ट्रीय पातळीवर श्रीयाने हॉर्स रायडींग मध्ये अनेक पारितोषिके पटकावली आहेत. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्रेयाने अचानक टोकाचे पाऊल का उचलले याबाबत हवेली पोलीस तपास करीत आहेत.