पुणे – पुणे शहरात करोना संसर्ग बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून पुणे महापालिका क्षेत्रात सध्या लागू असलेले निर्बंध यापुढेही कायम राहणार आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज सुधारित आदेश जारी केले. त्यामुळे पुणेकरांना निर्बंधमुक्तीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
याआधी 15 जुलैला शेवटचा कोविड प्रतिबंधक आदेश लागू करण्यात आला होता. या आदेशाची मुदत आज संपत असल्याने पालिका आयुक्तांनी सुधारित आदेश जारी केले आहे.
आयुक्तांच्या आदेशानुसार, पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग बंदच राहणार आहेत. ऑनलाइन शिक्षणास मात्र मुभा असेल. हे आदेश पुणे महापालिका क्षेत्रात येणाऱ्या पुणे कटक मंडळ आणि खडकी कटक मंडळ यांनाही लागू राहणार आहेत. पुढील आदेशापर्यंत हा सुधारित आदेश लागू असणार आहेत.
दरम्यान, करोना पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेले व अॅक्टिव्ह रुग्णसंख्या कमी असलेले जिल्हे आणि महापालिका क्षेत्रांमध्ये निर्बंधांत आणखी शिथीलता देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. त्यावर सकारात्मक निर्णय झाल्यास पुण्याला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील 25 जिल्ह्यांत करोना निर्बंध शिथिल करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. आज त्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.