पुणे – दत्तवाडीमध्ये व्यावसायिकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप असलेले भाजपचे नगरसेवक शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष आनंद रमेश रिठे (वय 43) यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे. हा गुन्हा राजकीय हेतूने प्रेरीत आहे. मयत व्यक्तीने आत्महत्या करावा असा आरोपीचा कधीही हेतू नव्हता.
नागरिकांकडून आलेल्या तक्रारीवरून कार्यवाही करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी दिलेली 25 कारणे गैरलागू आहेत, असा युक्तीवाद ऍड. अतुल पाटील यांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने यावर निकाल दिला.
नगरसेवक पदाचा गैरवापर करून जुन्या सायकली दुरुस्त करणाऱ्या व्यावसायिकाच्या घरावरील मोबाईल टॉवर पाडून तसेच घरही पाडण्याची धमकी देत मानसिक त्रास दिला. या कारणावरून व्यावसायिक संजय महादेव सुर्वे (वय 53, रा. दत्तवाडी) यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत संजय यांचा मुलगा शशांक याने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानंतर ऍड. अतुल पाटील, ऍड. सचिन हिंगणेकर, ऍड. राहुल वंजारी आणि ऍड. पवन कुलकर्णी यांच्यामार्फत रिठे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.