पुणे – आता ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्यांनाच ऍडमिट करून घेणार असून, अन्य रुग्णांना केअर सेंटरमध्ये दाखल करून घेण्यात येणार आहे. यामुळे ऑक्सिजनची तीव्र गरज असणाऱ्या रुग्णांना लगेचच बेड मिळण्याला मदत होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून महापालिकेची रुग्णालये, जंबो सगळीकडेच बेड नाही अशी स्थिती झाली आहे. अनेक रुग्ण रुग्णालयाच्या बाहेर बेड मिळण्याच्या प्रतिक्षेत बसून आहेत. पुण्यात नव्हे परंतु राज्यातील काही शहरांमध्ये कोविड सेंटर, रुग्णालयाच्या बाहेर अनेक रुग्णांचा दाखल करून न घेतल्याने मृत्यूही झाला आहे.
त्यामुळे सामान्य लक्षणे असलेल्या आणि ऑक्सिजन बेडची आवश्यकता नसलेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेड ऐवजी आयसोलेशन बेड देणे जास्त सोयीस्कर ठरणारे आहे. त्यामुळे ऑक्सिजन लेव्हल कमी झालेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेडवर शिफ्ट करता येणार आहे.
सध्या एकूण बाधितांमधील सुमारे 30 टक्के रुग्णांना ऑक्सिजन बेड लागतात. त्यातीलच रुग्णांना पुढे जाऊन व्हेंटिलेटर बेडवर शिफ्ट करावे लागते. महापालिकेकडे सध्या ऑक्सिजन बेड शिल्लक आहेत परंतु ऑक्सिजनच नसल्याने तेथे रुग्णांना दाखल करून घेता येत नाही अशी स्थिती झाली आहे. सध्या जे उपचारासाठी दाखल आहेत तेवढ्याच रुग्णांना पुरेल एवढेच ऑक्सिजन महापालिकेकडे शिल्लक आहे.