पुणे – राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये पुणे शहर व जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी सहभागी झाले. विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महसूल आणि अन्य विभागातील शासकीय कर्मचारी संघटनांनी धरणे आंदोलन केले. दरम्यान, दुपारनंतर संप स्थगित केल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केल्यानंतर कार्यालयात काही कर्मचारी हजर झाले.
नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, विविध शासकीय खात्यातील रिक्त पदे तत्काळ भरावीत, केंद्राप्रमाणे महिलांना बाल संगोपन रजा दोन वर्षाची मिळावी, अनुकंपाची भरती तत्काळ करावी यासह एकूण 22 मागण्यांसाठी राज्यातील महसूल, आरोग्य, कृषी व इतर शासकीय सेवेतील कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर गेले आहेत. महसूल विभागातील शिपाई, कोतवाल, महसूल सहाय्यक, अव्वल कारकून, मंडल अधिकारी, तलाठी, पदोन्नती नायब तहसीलदार यांच्यासह अन्य शासकीय विभागातील कर्मचारी या संपामध्ये सहभागी आहेत.
दरम्यान, पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग या ठिकाणी विविध शासकीय कर्मचारी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे मध्यवर्ती अध्यक्ष मारुती शिंदे, महसूल कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक चव्हाण, सरचिटणीस सचिन तांबोळी, वाहनचालक संघटनेचे गोपाळ राठोड आदीसह इतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मारुती शिंदे व दीपक चव्हाण यांनी आपल्या भाषणात शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असून या मागण्यांबाबत शासनाने गांभीर्याने विचार करून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी केली.