वडगावशेरी – खराडी-वडगावशेरी महोत्सवास कॉंग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत, या नेत्यांच्या सहमतीने संकेत गलांडे यांना प्रभाग क्र.5 मध्ये कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिली जाईल, असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी या महोत्सवातच जाहीरपणे सांगितले.
महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी कॉंग्रेसचे सरचिटणीस संकेत गलांडे यांच्यावतीने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन ज्येष्ठ नेते उल्हास पवार व माजी आमदार मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
मोहन जोशी म्हणाले की, वडगावशेरी विभागांमध्ये कॉंग्रेस पक्षाचे संकेत गलांडे हे गेल्या अनेक वर्षांपासून तळमळीने काम करीत आहेत. विद्यार्थी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना जोरदार समर्थन आहे. त्यामुळे मी संकेत गलांडे यांना सर्व नेत्यांचे सहमतीने प्रभाग क्र. 5 मध्ये कॉंग्रेसची पक्षाची उमेदवारी देण्यात येईल, असे जाहीरपणे सांगतो, असे जोशी स्पष्ट केले.
यावेळी किरण बोरा (शिक्षक), विनायक तुम्मा (शिक्षण अधिकारी), एकनाथ पठारे (वारकरी संप्रदायीक), दत्तात्रय खर्डे (चार्टर्ड अकाउंटंट), सनी देवकर (युवा उद्योजक) अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना “खराडी-वडगावशेरी भूषण पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. यावेळी दिलीप देवकर पाटील ,ऍड. अशोक संकपाळ, माजी नगरसेवक सुनील मलके, विनोद गलांडे आदी मान्यवर उपस्थित होते.