हडपसर – महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी झाली. तर, हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला किमान 14 जागा मिळाल्या पाहिजेत. आघाडी झाली नाही तर हडपसर मतदारसंघातील सर्व जागा शिवसेना लढवेल, असे संकेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देशमुख यांनी दिले आहेत.
हडपसर येथे आयोजित पत्रकार परिषदेत देशमुख बोलत होते. यावेळी उपशहर प्रमुख समीर तुपे, शहर संघटिका महिला आघाडी नगरसेविका संगीता ठोसर, नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे, नगरसेविका प्राची आल्हाट, विधानसभा प्रमुख राजेंद्र बाबर, उपप्रमुख महेंद्र बनकर आदी उपस्थित होते.
जिल्हा प्रमुख देशमुख म्हणाले की, हडपसर विधानसभा मतदारसंघात आम्ही प्रत्येक शाखेनुसार बैठका घेतल्या आहेत. येथे पक्षाची बांधणी मजबूत तसेच प्रत्येक प्रभागातून सक्रिय व निष्ठावंत शिवसैनिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सेनेला 14 जागा मिळाव्यात, असा आमचा आग्रह आहे. आघाडी झाली नाही, तर आमच्याकडे सर्व जागा लढण्यासाठी सक्षम उमेदवार आहेत.
उपशहर प्रमुख समीर तुपे म्हणाले की, महापालिकेत हडपसर विधानसभा मतदारसंघातून तीन नगरसेवक आहेत. याशिवाय मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेले सेनेचे सहा उमेदवार आहेत, हा निकष धरून आम्हाला सन्मानपूर्वक जागा व पक्षाची ताकद असलेले प्रभाग मिळावेत, अशी आमची भूमिका आहे. पक्षाच्या वरिष्ठांच्या आदेशानुसारच महाविकास आघाडीत की स्वतंत्रपणे लढायचे हे निश्चित होईल.
80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के “राजकारण’ या सिद्धांतावर शिवसेनेचे काम आहे. लोकांच्या प्रश्नासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी शिवसेना आणि शिवसैनिक नेहमीच रस्त्यावर उतरून काम करत आहे. मात्र, इतर पक्षांनी सोयीनुसार राजकारण करीत आजवर पुणेकरांना विकासापासून वंचित ठेवले आहे. हडपसरमध्येही महापालिकेची मोठी पदे इतर पक्षांच्या नगरसेवकांनकडे राहिली. मात्र, त्यांना अपेक्षित असा विकास साधता आला नाही. महापालिका निवडणुकीत शिवसेना एक व्हिजन घेऊन पुढे येत आहे. तेव्हा पुणेकरांनी शिवसेनेला एकदा संधी द्यावी. – प्रमोदनाना भानगिरे, नगरसेवक जिल्हा प्रमुख देशमुख; आघाडी न झाल्यास सर्व जागा लढणार