पुणे – रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्याबरोबरच शहरासह महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सर्वांनी अधिकाअधिक उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांच्या वतीने जिल्ह्यात रस्ते सुरक्षिततेबाबत दि. १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते हेल्मेट सुरक्षा मोटरसायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
रॅलीत प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालय – जुना बाजार – मनपा – बालगंर्धव – डेक्कन – फर्गसन कॉलेज रस्ता – शिवाजीनगर – संगम ब्रीज मार्गे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे रॅलीचा समारोप झाल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहिर यांनी जिल्ह्यातील रस्ते उपघातांना आळा घालण्यासाठी विविध विभागाचे अधिकारी संयुक्तपणे ब्लॅकस्पॉटना भेटी देत उपाययोजनांची माहिती दिली. तर प्रास्ताविकात संजीव भोर यांनी अभियानात रक्तदान शिबीर, वाहनचालकांसाठी नेत्र तपासणी शिबीर, शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रबोधनपर व्याख्याने, औद्योगिक वसाहतीत रस्ता सुरक्षावर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले.
अभियान यशस्वी करण्याकरिता परिवहन विभाग, वाहतूक पोलीस विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, शालेय शिक्षण विभाग व इतर संस्था, संघटना यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमामध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.