पिंपरी – ,शहरी आणि ग्रामीण संस्कृतीने नटलेल्या तसेच पारंपरिक खेळांनी, सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणि विविध आकर्षक, लोकोपयोगी वस्तूंनी आणि चविष्ट खाद्यपदार्थांनी सजलेल्या पाच दिवसीय पवनाथडी जत्रेचा मंगळवारी (दि. १६) समारोप झाला. पाच दिवसांत सुमारे एक लाखांहून अधिक ग्राहक, रसिक, श्रोत्यांनी भेट देऊन जत्रेचा लाभ घेतला. या पाच दिवसांत पवनाथडी जत्रेमध्ये ३ कोटींची आर्थिक उलाढाल झाली.
महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांमध्ये विपणन व विक्री कौशल्य विकसित व्हावे, यासाठी महापालिकेच्या वतीने ११ ते १५ जानेवारी २०२४ दरम्यान, सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर पवनाथडी जत्रा भरविली होती. या कार्यक्रमात महिला बचतगटांच्या तसेच दिव्यांग आणि तृतीयपंथी बचत गटांच्या प्रतिनिधींचा पवनाथडी जत्रेत त्यांनी केलेल्या विशेष कामाबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच, महापालिका आणि स्मार्ट सारथी ॲपच्या माध्यमातून लकी ड्रॉ स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये दापोडीचे अमोल जाधव हे विजेते ठरले. यावेळी त्यांना नाशिक फाटा येथील महालक्ष्मी सायकल्स यांच्या वतीने सायकल भेट देण्यात आली. शेवटी मराठी आणि हिंदी गीतांचा नजराणा ‘कारवाँ गीतोंका’ हा बदारदार कार्यक्रमाने पवनाथडी जत्रेची सांगता करण्यात आली.
महिला बचत गटांसाठी पवनाथडी जत्रा हक्काची बाजारपेठ ठरली. जत्रेत बचत गटांमार्फत उत्पादित वस्तूंची विक्री करुन स्वयंरोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. पाच दिवसांत पवनाथडी जत्रेत तीन कोटींच्या आसपास आर्थिक उलाढाल झाली.
– अजय चारठाणकर, उपायुक्त, समाज विकास विभाग