पुणे – शहरातील किमान तापमान 12 अंशांच्या खाली गेल्यामुळे शहरात थंडीचा कडाका वाढलेला आहे. दिवसाही हवेत गारवा असल्यामुळे चांगलीच थंडी जाणवत आहे. पुढील आठवडाभर हुडहुडी भरणाऱ्या थंडीचा अनुभव पुणेकरांना मिळणार आहे.
वातावरणातील सततच्या बदलामुळे 15 अंशाच्या पुढे गेलेले किमान तापमान 11 अंशापर्यंत खाली आले आहे. त्यामुळे अचानक थंडीचा जोर वाढला आहे. दरम्यान पुढील दोन दिवस पुण्यात आकाश ढगाळ आणि अधून-मधून ऊन असेल. तसेच किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविल्यामुळे थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे.
दोन दिवस अवकाळी पाऊस, तर नंतर थंडी
हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढत असल्याने कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात येत्या दि. 17 आणि 18 रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यानंतर उत्तरी हवेचा प्रभाव वाढून किमान तापमानात घट होणार असल्याने थंडीचा कडाका वाढणार आहे. तर सकाळी धुके पडेल.
मागील 24 तासांतील पुण्यातील प्रमुख भागातील किमान तापमान
पाषाण 11, हवेली आणि एनडीए 11.6, शिवाजीनगर 12.3, तळेगाव 13.2, इंदापूर 14, पुरंदर 14.6, खेड 16.4, कोरेगाव पार्क 16.8, मगरपट्टा 18.5, वडगावशेरी 19.2