पुणे – राज्याचे धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन यांची पुणे जिल्हा प्रमुख न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्टार जनरल आर. एन जोशी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
महाजन हे मूळचे जामनेर जि. जळगाव येथील असून त्यांचा जन्म २७ मे १९६६ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण जामनेर येथून पूर्ण झाले. तर त्यांनी वकिलीचे शिक्षण जळगाव येथील एस. एस. मणियार लॉ कॉलेजमधून झाले. यानंतर १९८८ पासून त्यांनी दिवाणी व फौजदारी वकिली व्यवसायाला आपले मुळगाव जामनेर येथून सुरुवात केली. तसेच महाजन यांची १९९७ साली एमपीएसएसी मार्फ़त सहाय्यक सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली.
त्यांनी २००८ पर्यंत वाशिम, जामनेर आणि धुळे येथे काम केले. त्यांची 2 मे 2008 रोजी जिल्हा न्यायाधीश म्हणून चंद्रपूर येथे नियुक्ती झाली. त्यांनी नांदेड येथे जिल्हा न्यायाधीश, मुंबई येथील औद्योगिक न्यायालयात सदस्य म्हणून, मुंबई येथे शहर दिवाणी व सत्र न्यायाधीश (लाचलुचपत प्रतिबंधक विशेष न्यायालय) आणि मोटार अपघात दावा न्यायाधिकरण, नागपूर येथे प्रशासकीय न्यायाधीश म्हणून काम केले. तर २९ मे 2018 रोजी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश बुलढाणा येथे नियुक्ती झाली.
ते २८ जुलै २०२१ पर्यंत बुलढाणा येथे होते. तसेच २९ जुलै २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत रजिस्ट्रार (तपासणी-I), उच्च न्यायालय, मुबई म्हणून काम केले. त्यांनतर त्यांची मुंबई येथील स्मॉल कॉस कोर्ट येथे नियुक्ती झाली होती. तर २६ मे २०२२ रोजी ते राज्याचे धर्मादाय आयुक्त बनले होते.