पुणे-करोना काळात महापालिकेने गेल्या दोन वर्षांत नागरिकांसाठी केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचलीच नाही, अशी शंका आता खुद्द महापालिका प्रशासनामध्येच निर्माण झाली आहे. त्यामुळे या काळात आपण काय काम केले आहे, याची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी तब्बल 30 लाख रुपये खर्चून महापालिका आता चकचकीत “कॉफीटेबल’ बुक काढणार आहे. 30 लाखांच्या हिशेबाप्रमाणे या एका बुकचा खर्च तब्बल तीन हजार रुपये असणार आहे.
विकासकामांसाठी पैसा नाही, अनेक प्रकल्प रखडले, रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी निधी नाही, सगळी तरतूद करोना प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये गेली अशी एक ना अनेक कारणे गेल्या दोन वर्षांपासून महापालिका प्रशासनाकडून सुरू असताना प्रत्येकी तीन हजार रुपये खर्च असलेल्या या “बुक’ची निर्मिती केवळ राजकीय दबावापोटी करण्यात येणार आहे. त्यामध्ये निविदाधारकाने मराठी आणि इंग्रजी भाषांमधील प्रत्येकी पाच पुस्तके तयार केलेली असावीत, प्रत्येक पुस्तक हे प्रतिष्ठित व्यक्ती किंवा मान्यताप्राप्त संस्थांविषयी असावे, निविदाधारकाला संशोधन करून निर्माण केलेल्या पुस्तकांचा अनुभव असावा, शासकीय किंवा निमशासकीय संस्थांचे किमान 20 लाख रुपयांचे काम केल्याचा त्यांना अनुभव असावा आणि शेवटी ही संस्था पुण्यात कार्यरत असावी, अशा अटी-शर्ती यासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
या पुस्तकामध्ये करोना साथीचा प्रादुर्भाव- प्रसार याची माहिती, त्यावर महापालिकेने मिळवलेले नियंत्रण, शहर करोनामुक्त करण्यासाठी सुरूवातीपासून केलेले प्रयत्न, करोनाच्या लढ्यात आघाडीवर असलेले लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या मुलाखती असणार आहेत.
वास्तविक, महापालिकेचा स्वत:चा जनसंपर्क विभाग आहे. हे काम त्यांचे आहे, असे असतानाही आरोग्य विभाग 30 लाख रुपये खर्चून हे “बुक’ काढत आहे. सुरूवातीला एकच निविदा आली तेव्हा नियमानुसार अपेक्षित स्पर्धा झाली नाही, असे कारण देत याची फेरनिविदा काढण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात 30 लाख रुपये खर्च असलेली निविदा मंजूर करण्याचा घाट घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कामासाठी “बी 2′ पद्धतीने निविदाप्रक्रिया राबवण्यात आली आहे.
केवळ एक हजार प्रती…
या “कॉफीटेबल बुक’च्या केवळ एक हजार प्रती छापण्यात येणार आहेत. महापालिकेचा जनसंपर्क विभाग आणि अत्याधुनिक प्रेस असतानाही, हे काम बाहेर देण्यात येत आहे. याशिवाय करोना स्थिती निर्माण झाली त्यावेळी असलेले महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडूनही त्यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती प्रशासनाने या “कॉफीटेबल बुक’साठी मागवण्यात आली आहे. सगळ्या विभागप्रमुखांनी माहिती द्यायची, आणि ती एकत्रित करून, चकचकीत पेपरवर बाहेरून छापून घ्यायची आहे. त्यासाठी हे 30 लाख रुपये मोजावे लागणार आहेत.
आरोग्य विभागाने करोना काळात केलेल्या कामांचे पुस्तक काढणार आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती घेण्यात येतील. महापालिका प्रशासनाकडे ही माहिती संग्रहित असणे आवश्यक आहे.
– डॉ. आशिष भारती,
आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका