रांजणगावमध्ये महागणपतीला पहाटे अभिषेक
रांजणगाव गणपती : श्रीराम प्राणप्रतिष्ठापन सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव गणपती मंदिरामध्ये महागणपतीला पहाटे पाच वाजता मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव यांच्या हस्ते अभिषेक केल्यानंतर भाविकांना मंदिर खुले करण्यात आले. याप्रसंगी देवस्थानचे विश्वस्त मंडळ मुख्य विश्वस्त ओमकार देव, अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष संदिप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव, पुजारी प्रसाद कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी, चेअरमन दत्तात्रय पाचुंदकर पाटील व देवस्थान कर्मचारी, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
उपाध्यक्ष संदीप दौंडकर व खजिनदार विजय देव यांनी सपत्नीक सकाळी ६ वाजता रामयाग, सामूहिक रामरक्षा पठण ६.३० वा., दुपारी ४ ते ६ ह. भ.प. आत्माराम महाराज शास्त्री ( आळंदी) यांचे कीर्तन, सायं ६.०० वा. श्री तुकाराम दैठणकर, पुणे यांचे सनई वादन, सायं ६ ते ७ दीपोत्सव श्री प्रसाद कुलकर्णी (पुजारी) यांच्यातर्फे व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती दत्तात्रय पाचुंदकर पाटील यांनी दिली.
देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त ओमकार देव यांच्या हस्ते दुपारी १२ वा. महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. प्रगतशील शेतकरी विष्णू साळुंखे यांनी श्री महागणपतीला १००१ संत्र्यांचा महानैवेद्य देण्यात आला. गणेश भक्त स्वप्नील खेडे ( तळेगाव ढमढेरे) यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात व मंदिर परिसरात देवस्थान ट्रस्टच्या वतीने फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.
तसेच भावेश कामदार या भाविकाकडून बोरांचा (शबरीची बोरं) महाप्रसाद देण्यात आला. देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी जलद दर्शन व्यवस्था, प्रसाद, पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.