पुणे – टाळेबंदीत कोरेगाव पार्कमधील एका हॉटेलमधून मद्यविक्री सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खंडणीविरोधी पथकाने तेथे छापा टाकून सुमारे नऊ लाखांचे मद्य जप्त केले. या कारवाईत पोलिसांनी एकाला अटक केली.
कलिमउद्दीन रियाजउद्दीन शेख (मूळ रा. बरीब, ओडिशा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कोरेगाव पार्क भागातील गल्ली क्रमांक चार येथे असलेल्या सतरंज हॉटेलमधून मद्याची विक्री होत असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकून 8 लाख 84 हजार 915 रूपयांच्या मद्याच्या बाटल्या जप्त केल्या.शेख हॉटेलमध्ये कामगार आहे. त्याच्याविरोधात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, महाराष्ट्र कोविड उपाययोजना कलम तसेच संसर्गजन्य रोग अधिनियम तसेच अन्य कलमांन्वये कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडिक, उपनिरीक्षक संजय गायकवाड आणि पथकाने ही कारवाई केली.
शेखविरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक गायकवाड याप्रकरणाचा तपास करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात बेकायदा मद्यविक्री वाढल्याने गुन्हे शाखेकडून कारवाई सुुरू झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी भारती विद्यापीठ पोलिसांनी दुधाच्या टेम्पोमधून बिअरच्या बॉटल्सची वाहतूक करताना टेम्पो जप्त केला होता.