पुणे (प्रतिनिधी) : बालेवाडी भागात गॅस एजन्सी दुकानास आग लागून सिलिंडरचे स्फोट झाल्यामुळे लगतच्या ५ पत्र्याचे शेडचे दुकानांचे नुकसान झाले होते. या प्रकरणी गॅस एजन्सी मध्ये काम करणाऱ्या कामगारास पोलिसानी अटक केली आहे. तसेच एजन्सी मालक आणि जागा मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माधव मोगलाजी अव्वलवार (वय २६, रा. चाकणकर मळा बाणेर) असे अटक केलेल्याचे नांव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक दीपक धाबेकर यांनी फिर्याद दिली असून चातुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बालेवाडीतील दसरा चौकात शुक्रवारी रात्री नम्रता गॅस एजन्सी या दुकानास आग लागून लागतचे ५ दुकानांचे जळून नुकसान झाले होते. पोलिसानी या घटनेचा तपास केला असता आरोपी कामगार हा गॅस एजन्सीच्या दुकानात मोठ्या गॅस सिलिंडर मधील गॅस लहान सिलिंडर मध्ये भरून तो विक्री करण्याचे काम करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या आगीत इलेक्ट्रिक डीपीचेही जळून नुकसान झाले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक माया देवरे या करीत आहेत.