पिंपरी, दि. 12 (प्रतिनिधी) – शेकडो लोकांचा जीव घेणाऱ्या “करोना’ने कित्येक गोरगरिबांच्या चुलीही विझविल्या. गरिबांच्या घरातील लहानथोरांना उपाशी ठेवले. हातावर पोट असणाऱ्या गरीब कुटुंबांची होणारी फरपट त्याची तर कल्पनाच न केलेली बरी! मात्र, अशा संकटकाळातही “माणुसकी’चे नाते निभावणारे अनेकजण समाजात दिसतात. पुण्यातील गडाळे परिवारानेही करोना संकटाच्या या कठीण काळात “माणुसकी’च्या हातांनी शेकडो गरिबांच्या चुली पेटविल्या.
करोनाच्या संकटामुळे देशासह राज्यात लॉकडाउन जाहीर केले आहे. या स्थितीत गोरगरिबांसह सर्वसामान्य नागरिकांच्या घरावर आर्थिक संकट कोसळले आहे. अनेकांच्या घरातील अत्यावश्यक साहित्य संपल्याने चुली बंद राहू लागल्या आहेत. या संकटाच्या काळात पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात गडाळे परिवार “एक हात माणुसकी’च्या नात्याने मदतीला धावून आले आहे. शेकडो कुटुंबीयांच्या घरातील चुली पेटवून मदतीचा हातभार लावला आहे. दरम्यान स्वखर्चाने पोलिसांना फेसशिल्ड, मास्क आणि नागरिकांना धान्य, किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघातील रविवारपेठ, गणेशपेठ, बुधवारपेठ आदी परिसरात संकट समयी सामाजिक बांधिलकी जोपासत गडाळे परिवार समाजातील गरजू घटकांच्या मदतीला धावून आले आहे. करोना संकटामुळे सर्वसामान्य घरातील चुली पेटवण्यासाठी त्यांनी एक हात माणुसकीचा पुढे केला आहे.
शेकडो सर्वसामान्य कुटुंबीयांना धान्य आणि किराणा साहित्याचे एकत्रित किट बनवून वाटप केले आहे. यामध्ये पाच किलो गहू, तीन किलो तांदूळ, एक किलो दाळ, एक किलो तेल, शेंगदाणे चटणी, लोणचं बॉटल व मास्क, कापडी पिशवी दिली आहे. तसेच समाजाची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांना फेसशिल्ड, मास्कचे वाटप केले आहे.
माजी नगरसेविका सुनंदा सतीश गडाळे, युवक नेते तेजस विजय गडाळे, तुषार गडाळे, गौरी सणस यांच्याकडून नागरिकांमध्ये सोशल डिस्टन्स ठेवून साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. यापुढेही गरजू कुटुंबीयांना हे साहित्य वाटप करणार असल्याचे तुषार गडाळे मित्र परिवारांकडून सांगण्यात आले आहे. गडाळे परिवाराच्या औदार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.