वाघोली (प्रतिनिधी) – वाघोली तालुका हवेली येथील तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रावण सखी सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची सून वृषाली श्रीकांत शिंदे यांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. तेजस्विनी सामाजिक संस्थेचे अध्यक्षा डॉ. सारिका किरण पवार यांच्या संकल्पनेतून रोजच्या धावपळीच्या जीवनातून एक विरंगुळा म्हणून महिलांसाठी खास श्रावण सखी सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यात सुंदर वेशभूषा, मंगळागौर आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सून वृषाली श्रीकांत शिंदे उपस्थित होत्या. त्यांनी महिलांनी सादर केलेल्या मंगळागौर कार्यक्रमात तसेच महिलांसोबत फुगडी खेळून श्रावण सखी सोहळ्याचा आनंद द्विगुणित केला.
वाघोली येथील वाघेश्वर मंदिराला भेट देत वाघेश्वराचे दर्शन घेऊन होत असलेल्या विकास कामांबाबत देखील शिंदे यांनी ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी उपसरपंच कैलास सातव पाटील, माजी उपसरपंच महेंद्र भाडळे, सुशील जाधव, चैतन्य सातव, माजी ग्रामपंचायत सदस्य सुधीर भाडळे, दत्तात्रय कटके,
माजी ग्रामपंचायत सरपंच संजीवनी वाघमारे, माजी ग्रामपंचायत सदस्या सुनंदा दाभाडे, संगीता कोलते, वंदना दाभाडे, शुभांगी भाडळे, कुंदा सातव, सुरेखा सातव, मीना गुंड, सरला पवार आदी मान्यवर व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.