बेंगळुरू :- कर्नाटकमध्ये एका शिक्षिकेने दोन मुस्लिम विद्यार्थ्यांशी पाकिस्तानात जाण्याबाबत रागाने बोलल्याचे प्रकरण नव्याने समोर आले आहे. सदर शिक्षिक असे बोलत असल्याची बाब मुलांच्या पालकांना समजताच त्यांनी या वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शिक्षिकेविरुद्ध तक्रार केली. त्यानंतर आरोपी शिक्षिकेची त्या शाळेतून बदली करण्यात आली आहे.
ही घटना गुरुवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी पाचवी इयत्तेतील दोन विद्यार्थी शाळेच्या आवारात एकमेकांशी भांडत होते.
त्यावेळी सदर शिक्षिका तेथे आली आणि रागाने त्यांना म्हणाली की, तुम्ही इथे दंगा करत बसू नका. तुम्ही लोक पाकिस्तानात जा. कारण हे हिंदू राष्ट्र आहे. ही घटना ज्या शाळेत घडली ती कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यातील उर्दू संस्था आहे.
या घटनेबाबत गटशिक्षण अधिकारी बी नागराज यांनी सांगितले की, या घटनेची माहिती मिळताच आम्ही त्या शिक्षिकेची दुसऱ्या शाळेत बदली केली आहे. सोबतच या प्रकरणाची विभागीय चौकशीही सुरू केली आहे. आरोपी शिक्षिका गेल्या आठ वर्षांपासून या उर्दू शाळेत शिकवत आहे.