दंतेवाडा :- छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात तीन महिलांसह आठ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. दुसऱ्या एका घटनेत अन्य चार नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली.
दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी सांगितले की, शुक्रवारी पोलिसांसमोर हजर झालेल्या आठ जणांवर रस्ते तोडणे, नक्षलवादी पोस्टर्स आणि बॅनर लावणे आणि काटेकल्याण भागात नक्षलवादी नेत्यांना रसद पुरवणे असे आरोप आहेत.
अटक करण्यात आलेल्या इतर चार जणांचा अरणपूर भागात गेल्या वर्षी गोळीबार आणि स्फोट घडवून आणण्याच्या घटनेत सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.
राज्य सरकारच्या पुनर्वसन मोहीमेने आपण प्रभावित झाल्याने शरणांगती पत्करण्याचा निर्णय घेतला आहे, असे शरण आलेल्या नक्षलवाद्यांनी सांगितले. शरण आलेल्यांपैकी काही जणांवर पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षिस लावले होते. छत्तीसगड जिल्ह्यात आत्तापर्यंत 639 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यांचे आता नागरी जीवनात पुनर्वसन केले जात आहे.