पुणे – बाकडांची होणार तपासणी

निवडणुकांच्या तोंडावर शहरात बसविली 7 हजार बाकडे


संबंधित क्षेत्रीय कार्यालयांकडून वापरकर्ता प्रमाणपत्र मागविणार

पुणे – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतून शहरात तब्बल सात हजार बाकडे बसविण्यात आली आहेत. या बाकडांचा हिशेब ठेवण्यासाठी महापालिकेकडून ज्या क्षेत्रीत कार्यालयांकडून ती बसविण्यात आली आहेत. त्या कार्यालयांकडून वापरकर्ता प्रमाणपत्र (युटीलायजेशन सर्टीफिकेट) घेण्यात येणार आहे. प्रामुख्याने जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात ही बाकडे देण्यात आली आहेत.

लोकसभा निवडणुका असल्याने महापालिकेतील नगरसेवकांकडून नागरिकांना खुष करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बकेट तसेच बाकडे देण्यासाठी प्रशासनाकडून वॉर्डस्तरीय निधीतून 7 हजार बाकडे खरेदी करण्यात आली आहेत. शहरात गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात बाकडे वाटप झाले असल्याने नवीन बाकडे खरेदी करण्यात येऊ नयेत, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांकडून करण्यात आली होती. त्यामुळे प्रशासनाने ही खरेदी थांबविली होती. मात्र, राजकीय दबाव आणत लोकसभा निवडणुकीपूर्वी ही बाकडे खरेदी करून ती तातडीने शहरात बसविण्यात आली आहेत. ही बाकडे भांडार विभागाकडून खरेदी करून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आली आहेत. त्यांच्याकडून नगरसेवकांच्या मागणीनुसार, ती प्रभागात बसविण्यात आली आहेत. मात्र, आता प्रशासनाने ही बाकडे कोठे लावली, त्याचे ठिकाण, एकूण लावण्यात आलेली बाकडे,शिल्लक बाकडे तसेच शिल्लक बाकडे ठेवण्यात आलेली जागा अशी माहिती क्षेत्रीय कार्यालयांकडून घेतली जाणार आहे. त्यामुळे खरचं या बाकडांचा नागरिकांना उपयोग झाला का, ती कुठे वापरली गेली हे स्पष्ट होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.