पुणे – शहरातील वाढती ई-वाहनांची संख्या लक्षात घेऊन महापालिकेकडून शहरात ८२ ठिकाणी ई-चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. यातील २१ स्टेशनचे काम पूर्ण झाले असून या चार्जिग स्टेशनचे लोकार्पण येत्या शुक्रवारी (दि.१२) महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
पालिकेकडून २०२२ मध्ये या स्टेशनसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. तर, हे स्टेशन उभारण्याचे काम खासगी कंपनीस देण्यात आले होते. त्यानुसार, पालिकेकडून जागा उपलब्ध करून देण्यात आली. सर्व खर्च संबंधित कंपनीने केला आहे. चार्जिंग मधून मिळणार्या उत्पन्नातील ५० टक्के हिस्सा महापालिकेस दिला जाणार आहे. प्रामुख्याने महापालिकेच्या पार्किंगमध्ये तसेच क्षेत्रीय कार्यालयांच्या आवारात या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या २१ ठिकाणी असणार सुविधा
महापालिका भवन, सावरकरभवन, गणेश कला क्रीडा मंच, यशवंतराव चव्हाण नाटयगृह, घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय, टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालय, बालगंधर्व नाटयगृह, स्केचर्स शो रूम, जंगली महाराज रस्ता, मॅकडोनाल्ड पार्किंग जगंली महाराज रस्ता, लेमन सलून फर्गुसन रस्ता पार्किंग, कुशल वाॅल स्ट्रीट फर्गुसन रस्ता, आर्ट स्टेशन फर्गुसन रस्ता, मिलेनियम प्लाझा फर्गुसन रस्ता, पेशवे उद्यान पार्किंग, आर्यन पार्किंग मंडई, गुलटेकडी पार्किंग, नवलोबा पार्किंग शुक्रवार पेठ, पंडीत भिमसेन जोशी कलादालन, संजय गांधी हाॅस्पीटल, पद्मावती पंपिग स्टेशन पार्किंग.
प्रती युनिट १३ ते १९ रूपयांचा खर्च
महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या या चार्जिंग स्टेशनच्या ठिकाणी नागरिकांसाठी क्यू आर कोड उपलब्ध करून देण्यात आला असून त्याद्वारे मोबाईल अॅप वापरून नागरिकांना आॅनलाईन पैसे भरून आपली वाहने चार्जिंग करता येणार आहेत.