बारामती – बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघाने ५ रुपये प्रति लिटर शासन अनुदान योजनेची सर्व प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधी व दूध उत्पादक शेतकरी यांना माहिती देण्यासाठी बारामती दूध संघ “शरद सभागृह” येथे संघाचे चेअरमन पोपटराव सोमनाथ गावडे व राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली होती. सदर सभेस बारामती तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधी, दूध उत्पादक शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
राज्यातील दूध उत्पादक शेतक-यांच्या दुधाला उचित भाव मिळण्यासाठी दूध उत्पादक शेतक-याला प्रति लिटर ५ रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी दूध उत्पादक शेतक-याने शासनाने दिलेल्या विहित नमुन्यात फॉर्म भरून द्यावयाचा असून शासन आदेश (जी.आर.) व दूध उत्पादक शेतक-यांने भरून द्यावयाचा फॉर्म याची सविस्तर माहिती प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधी व दुध उत्पादक शेतक-यांना देण्यात आली. अनुदान योजनेचा लाभ घेणेसाठी दूध उत्पादक शेतक-यांचे बँक खाते हे त्यांच्या आधारकार्डशी व पशुधनाच्या आधारकार्डशी (ईयर टेंग) संलग्न (लिंक) असणे आवश्यक असेल.
त्यासाठी दूध उत्पादक शेतक-याने शासकिय पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुवैद्यकीय अधिकारी यांना भेटून आपल्या जनावरांची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. तसेच शासन निर्णयातील अटी व शर्तीतील निकषाच्या अधिन राहून दूध उत्पादक शेतक-याला ३.५/८.५ गुणप्रतकरीता प्रति लिटर २७ रुपये एवढा दर देणेत येणार आहे. त्यानंतर दूध उत्पादक शेतक-यांना शासनामार्फत ५ रुपये प्रति लिटर बँक खात्यावर ऑनलाइन पध्दतीने वर्ग करण्यात येणार आहेत. दुधाच्या गुणप्रतकरीता फेंट/एस.एन.एफ ३.५/८.५ ते ३.२/८.३ पर्यंत ३० पैसे डिडक्शन तसेच वाढीव फॅट ३.५/८.५ चे पुढे प्रति पॉईंट ३० पैसे इंक्रीमेंट याप्रमाणे राहणार आहे.
दूध उत्पादक शेतक-यांसाठी शासनाने निर्धारित केलेली गुणप्रत किमान फॅट/एस.एन.एफ ३.२/८.३ असणे बंधनकारक आहे. ३.२/८.३ गुणप्रतीच्या वरील दूधाचा पुरवठा करणे बंधनकारक आहे. ३.२/८.३ पेक्षा कमी गुणप्रतीच्या दुधाचा पुरवठा झाल्यास अनुदान देय राहणार नाही. अशी माहिती उपस्थित सर्व प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधी व दूध उत्पादक यांना देण्यात आली. तरी तालुक्यातील सर्व दूध उत्पादक शेतक-यांनी आपल्या जनावरांची नोंदणी करून शासन अनुदान योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
व्हाईस चेअरमन संतोष शिंदे, व्यवस्थापकीय संचालक डॉ. सचिन ढोपे, संचालक मंडळ, उपमहाव्यवस्थापक (वित्त व लेखा) संजय भोसले, डेअरी मॅनेजर संदीप भापकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश कदम, संघाचे सर्व पशुमित्र व सर्व संस्थांचे चेअरमन, सचिव उपस्थित होते.