पुणे – येरवडा कारागृहातील व्यक्तीने त्याच्या बहिणीला सांकेतिक भाषेत चिठ्ठी लिहिली. यात “सॅमसंग गुरू कंपनीचे दोन मोबाइल फोन, एअरटेल, वोडाफोन, आयडियाचे प्रत्येकी एक सिम कारागृहात पोहोच कर’, असा आशय लिहिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
सदनिकेच्या व्यवहारासाठी सात लाख रुपये दिल्यानंतर त्याबदल्यात 25 लाख रुपये वसूल करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तो येरवडा कारागृहात आहे. या प्रकरणात महिलेवरही गुन्हा दाखल आहे.
या प्रकरणात सागर राजपूत (34, रा. शास्त्रीनगर, कोथरूड. मूळ वडोदरा, गुजरात) याच्यासह त्याच्या बहिणीला अटक करण्यात आली आहे. त्यापूर्वी सागरने तिला सांकेतिक भाषेत चिठ्ठी पाठवली होती. या चिठ्ठ्या पोलिसांनी जप्त केल्या आहे.
दरम्यान, या बहिणीने जामिनासाठी अर्ज केला होता. त्याला सहायक सरकारी वकील ऍड. विशाल मुरळीकर यांनी विरोध केला. सागरच्या पत्नीच्या मदतीने या बहिणीने फिर्यादीला धमकावून त्यांच्याकडून जुलैअखेरपर्यंत 4 लाख 45 हजार रुपये घेतले आहेत.
ती जामिनावर बाहेर आल्यास अशाच प्रकारचा गुन्हा करणार असल्याची धमकी तिने साक्षीदारांना दिला आहे. टोळीतील सर्व कामकाज सध्या ती पाहत आहे. पैसे मिळण्यासाठी ती साक्षीदारांच्या घरी जाऊन राहत आहे.