पुणे – रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणात गुन्हे शाखेने महिलेसह चौघांना अटक केली. खडकी भागात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी निकीता ताले (25, रा. एमआयडीसी, भोसरी), राहुल वाळुंज (27), रोहन वाळुंज (20, दोघे चापेकर चौक, चिंचवड), प्रतीक भोर (26, श्री हॉस्पिटलसमोर चिंचवड) यांना अटक करण्यात आली. खडकीतील गुरुद्वारा रस्त्यावर ताले ही रेमडेसिविर इंजेक्शन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना मिळाली होती. त्यानंतर पथकाने या भागात सापळा लावला.
बनावट ग्राहकाच्या मदतीने पोलिसांनी तालेशी संपर्क साधला. तेव्हा तिने एक इंजेक्शन विक्री 37 हजार रुपयांना उपलब्ध होईल, असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ताले हिला पकडले. चौकशीत भोर, वाळुंज यांनी तिला इंजेक्शन विक्रीसाठी दिल्याची माहिती दिली.
पोलिसांनी वाळुंज आणि भोर यांना ताब्यात घेतले. या कारवाईसाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक जयश्री सवदंती यांनी सहाय्य केले. सवदंती यांनी याबाबत खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक निरीक्षक प्रकाश मोरे, उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे आदींनी ही कारवाई केली.