पुणे – जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये जेवणाची निविदा मिळावी, यासाठी राजकीय पदाधिकाऱ्यांनी धमक्या दिल्याच्या तक्रारी येथील डॉक्टरांनी महापौरांकडे केल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणाची माहिती आपण स्वत: विभागीय आयुक्तांकडून घेणार असून, अशा प्रकारे कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नसल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात दिला. तसेच वेळप्रसंगी संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.
जम्बो कोविड सेंटरच्या डॉक्टरांना काही राजकीय व्यक्तींकडून त्रास दिला जात आहे. हे प्रकार असह्य झाल्याने या प्रकारांची तक्रार घेऊन डॉक्टरांनी थेट महापालिका अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यातले एक नेते वारंवार त्रास देत असल्याचा आरोप महिला डॉक्टरने केला. दरम्यान, या हॉस्पिटलमधील जेवण पुरवण्याचे काम एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकऱ्यास हवे असल्याची जोरदार चर्चा असून, या पदाधिकाऱ्याकडून हॉस्पिटलच्या व्यवस्थापनास धमकावण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे व्यवस्थापनावर दबाव टाकण्यासाठी डॉक्टरांना धारेवर धरल्याचे बोलले जात आहे.
याबाबत शनिवारी आढावा बैठकीनंतर पवार यांना पत्रकारांनी विचारले असता; “या प्रकरणी बैठकीत आपल्याकडे कोणीही तक्रार केलेली नाही. तसेच हा प्रकार होत असेल, तर ही गंभीर बाब आहे,’ अशा शब्दांत पवार यांनी इशारा दिला.